हिमाचलमध्ये प्रवासी बसवर डोंगरकडा कोसळला

दरडीखाली 40 जण अडकले
सिमला | वृत्तसंस्था |
हिमाचल प्रदेशमधील किन्नूरमध्ये एका प्रवासी बसवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर ही दरड कोसळली आहे. तसेच या दरडीमध्ये इतर अन्य वाहनेही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये किमान 40 जण ढिगार्‍याखाली अडकल्याची शक्यता पोलीस उपायुक्त होसेन सिद्दकी यांनी व्यक्त केलीय. चौरा आणि किन्नूर जिल्ह्यांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. दुर्घटनेमध्ये एक डोंगर कडाच तुटून बसवर पडल्याने संपूर्ण बस या ढीगार्‍याखाली सापडली.ही बस किन्नूरमधून हरिद्वारकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग पाचवर झालेली ही दुर्घटना छील जंगलाच्या परिसरात घडली आहे. या दुर्घटनेमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.

या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. बसच्या चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं असलं तरी या ढिगार्‍याखाली अनेक प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दरडीखाली बस बरोबर काही खासगी वाहनेही गाडली गेल्याची शक्यता आहे. खासगी वाहनांमधील काही लोक मदतीसाठी ओरडत होते असं स्थानिकांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रेकाँग पिओ- शिमला मार्गावर हा अपघात झालाय. एक ट्रक आणि हिमाचल प्रदेश राज्य परिवहन मंडळाची एक बस या दरडीखाली सापडली आहे. या ढिगार्‍याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी मदतीसाठी इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) तुकडीला बोलवण्यात आलं असून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. याबद्दलची माहिती आयटीबीपीनेच दिली आहे.

Exit mobile version