करंजाडेमधून संजोग वाघेरेंना आघाडी मिळवून देणार

शेकापचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा ठाम विश्वास

| पनवेल | वार्ताहर |

करंजाडे नोडमधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना भरघोस आघाडी मिळवून देणार, असा ठाम विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, दोन वेळा खासदारकी उपभोगणाऱ्या बारणे यांच्याविरोधात जनमत तयार झालेले आहे. राज्यात आणि देशातदेखील हीच परिस्थिती आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधक संपवण्याच्या हुकूमशाही पद्धतीला जनता अक्षरशः वैतागली आहे. त्यामुळे नवा आणि जनतेशी नाळ जुळलेला खासदार या वेळेला जनता निवडून देणार आहे.

करंजाडे नोड हा पनवेल शहराच्या अगदी कुशीला असला तरी देखील तांत्रिकदृष्ट्या तो उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये येतो. मूळ गाव, आदिवासी पाडे आणि सिडकोने वसविलेली वसाहत असे संमिश्र रहाणीमान या नोडमध्ये आढळून येते. होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सगळ्यात जवळची नागरी वस्ती म्हणून या नोडला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. करंजाडेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य अगदी सुरुवातीपासून राहिलेले आहे. महाविकास आघाडी मित्र पक्षांची साथ प्राप्त होणार असल्यामुळे या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांचे पारडे जड समजले जाते.

आमच्या विरोधकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जरी विजयाचे गणित जुळवून आणले असले तरी देखील विकास कामे करण्याचे कसब त्यांच्या अंगी नाही. केवळ सत्ता उपभोगायची आणि विरोधकांना संपवायचे यापलीकडे यांना दुसरे काहीही येत नाही. दिल्लीमधील सत्ताधिकारी, राज्यामधील सत्ताधिकारी आणि ग्रामपंचायतीतील सत्ताधिकरी यांच्या विरोधात जनता प्रचंड वैतागलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेचा रोष मतपेटीमधून नक्कीच उमटेल. 33 मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजीव वाघेरे पाटील यांची मशाल हाती घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. मला नुसता विश्वासच नव्हे तर, शंभर टक्के खात्री आहे की, करंजाडे विभागातून आम्ही संजोग वाघेरे पाटील यांना भरघोस आघाडी मिळवून देऊ, असेही रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले.

Exit mobile version