कर्जतमध्ये शिंदे गटाने भाजपला फसवले

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्याचवेळी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला शिंदे गटाची साथ मिळाली नाही आणि फसवले गेले असा आरोप भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी केला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, संघटनात्मक मजबुती, तसेच युतीबाबत कार्यकर्त्यांच्या भावना खुलेपणाने मांडण्यात आल्या. बैठकीत मार्गदर्शन करताना किरण ठाकरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या स्थानिक जनतेच्या विकासाचा कणा आहेत. युती कोणाबरोबर होईल किंवा होणार नाही, याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत; मात्र भाजपाने कोणत्याही परिस्थितीत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली पाहिजे. परिवर्तन घडवायचे असेल तर ङ्गएकला चलो रेफ या भूमिकेतून काम करण्याची तयारी ठेवावी लागेल.

या बैठकीत कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.पक्षांतर्गत निर्णय घेताना मंडळ अध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांनी स्पष्ट शब्दांत मांडली. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना आणि मतांचा सन्मान न झाल्यास पक्ष संघटनेवर विपरीत परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला. मंडल अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी आक्रमक भूमिका घेत हीच वेळ आहे, आता भाकरी फिरवण्याची. आता नाही तर कधीच नाही असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडता येते, त्यामुळे या निवडणुका गांभीर्याने घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यासाठी हात वर केले, मात्र शिवसेना शिंदे गटासोबत जाण्यासाठी एकाही कार्यकर्त्याने हात वर केला नाही. या प्रतिक्रियेमुळे कर्जत ग्रामीण तसेच कर्जत शहर भागात भाजप कार्यकर्त्यांची शिंदे गटाविषयी उघड नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.

Exit mobile version