स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघात राज्यसरकारमधील महायुती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार नाही. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमधून फारकत घेतली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी नवीन युती दिसणार आहे. या पक्षाकडून आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका लढल्या जाणार आहेत, अशी घोषणा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असतानासुद्धा कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षातील विस्तव जात नाही. मागील विधानसभा निवडणुकीत ही दोन्ही पक्ष एकमेकांसमोर ठाकले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे सूत जुळले असून, या दोन्ही पक्षांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे दोन्ही पक्ष कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांनी गेली दोन महिने सुरू असलेली गुप्त बैठकांची राजनीती आज पहिल्यांदा सर्व जनतेसमोर आली आहे. कर्जत येथील रेडियन ब्लू रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष या दोन पक्षांच्या प्रमुखांची बैठक झाली.
या नवीन युतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा प्रवक्ता भरत भगत, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, प्रदेश नेते भगवान भोईर यांच्यासह जिल्हा युवक अध्यक्ष तालुक्याच्या युवक, महिला तसेच अन्य सेलचे अध्यक्ष आणि तालुक्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, प्रभारी तालुका प्रमुख बाजीराव दळवी, तालुका संघटक बाबू घारे, तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर आदींसह युवासेना, महिला आघाडी तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत, खोपोली, माथेरान या तीन नगरपरिषद आणि खालापूर नगरपंचायत या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीबाबत चर्चा झाल्याचे कळते. तर, तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी ही युती निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती आणि घोषणा या बैठकीत करण्यात आली.





