कोकणात मविआने उमेदवारांच्या पाठीशी राहावे

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

राज्यातील सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांनी संघटनशक्ती दाखवून महाविकास आघाडीतील उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी येथील कार्यकर्ता बैठकीत केले. महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असल्यास त्याच्या प्रचारासाठी एक होण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत घाटे बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, मोंड उपसरपंच अभय बापट यांच्यासह ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी आदी उपस्थित होते. यावेळी घाटे यांनी, यावेळच्या निवडणुकीत संघटनशक्ती महत्त्वाची असून कार्यकर्त्यांनी एकीचे बळ दाखविण्याचे आवाहन केले. सुशांत नाईक म्हणाले, राज्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण झाले. त्याला यावेळच्या निवडणुकीत मतदार चोख प्रत्युत्तर देतील. यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित राहून प्रचारावर भर देण्याची आवश्यकता आहे. सत्ता परिवर्तनाची हीच वेळ आहे. यासाठी उमेदवार निश्‍चित झाल्यावर महाविकास आघाडी म्हणून संयुक्तपणे प्रचाराचा श्रीफळ वाढवला जाईल. यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वय राखून काम करण्याची आवश्यकता आहे. बापट यांनी, उमेदवार काणीही असूदे, तो पक्षाचा निर्णय असेल. मात्र, कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून महाविकास आघाडीला बळ देण्याची आवश्यकता व्यक्त केली. उमेदवार कोण आहे, याहीपेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार मानून कार्यरत राहण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक चंद्रकांत पाळेकर यांनी केले. आभार अभय बापट यांनी मानले. नवनिर्वाचित खासदार गेल्या सुमारे पाच महिन्यांत येथील मतदारांनी पाहिलेले नाहीत. त्यांना जनतेच्या प्रश्‍नांची जाण आणि काही देणेघेणे नाही. माजी खासदार विनायक राऊत गावागावांत मतदारांना भेटत होते, असे सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले. अलीकडेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त होते; मात्र प्रवेश करणारे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे नाहीत, असेही पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version