। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई येथील करावे गावाजवळ आज एका मद्यधुंद कार चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात धक्कादायक आणि विशेष म्हणजे ज्या कारणे हा अपघात केला त्यावर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट होती. एवढेच नाही तर कारमध्ये मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे ओळखपत्र साडपडले. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करावे गावाजवळ एक इनोव्हा कार सुसाट वेगाने येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आणि रस्त्यावरून धावत असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेत गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी कारची पाहणी केली. तेव्हा कारवर पोलीस अशी पाटी होती. तसेच कारच्या आत मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार, कार चालक प्रचंड नशेत होता आणि त्याच अवस्थेत तो गाडी चालवत होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकानी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ही कार नेमकी कोणाची आहे आणि अपघाताच्या वेळी चालक कोण होता. याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे ओळखपत्र सापडल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







