आगीत कडधान्य जळून खाक
। मुंबई | प्रतिनिधी ।
उन्हाळ्याच्या झळा तीव्रपणे जाणवू लागल्या आहेत. यामुळे दिवसेंदिवस वणव्याच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशातच महाड तालुक्यातील तेलंगे गावालगत लागलेल्या वणव्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. वाढत्या वणव्यांमुळे जंगलाजवळील शेती, फळबागा आणि पिकांचे, पशु, पक्षी यांचे अतोनात नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तेलंगे तेलगाटी येथे दुपारच्या सुमारास लागलेल्या वणव्याच्या आगीमुळे तेलंगे तसेच ओवळे गावातील शेतकरी दशरथ निंबरे, विजय निंबरे, नलिनी भावे, संजय भावे यांच्या तूर पिकाचे तसेच, अनंत गोरे, तुकाराम कोबनाक, शंकर येळकर, तुकाराम चिमण, मानसी पवार यांचे पावटा, उडीद पिकाचे, शेवंती आग्रे, सुभाष मालप, संदेश मनवे, शिवाजी मालप यांच्या तूर, पावटा, कुळीद पिकाचे, तर भागवत शिंदे, नामदेव मोरे यांच्या तूर, पावटा पिकाचे, तसेच नामदेव मोरे यांच्या तूर, पावटा, चवळी, कुळीद पिकाचे, गुलाम गफूर जेटाम, जफर जेटाम यांच्या तूर, पावटा, कुळीद आणि चवळी कडधान्याचे वणव्याच्या अगीमध्ये जळून नुकसान झाले आहे.
या दरम्यान शेतातील पावटा, तूर, आवरा, कुळीद, उडीद उत्पादन घेण्यात आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला गेल्याची स्थानिक शेतकरी वर्ग अहवालदिल झाला आहे. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता वाढल्याने आग विजवणे शक्य झाले नाही. या आगीमध्ये तेलंगे, तेलंगे मोहल्ला आणि ओवळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.






