महावितरणच्या उघड्या कारभाराचा धक्का; दैव बलवत्त म्हणून जीव वाचला
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात क्रिकेट खेळत असलेला मुलगा हरवलेला चेंडू शोधण्यासाठी गेला आणि उघड्या डीपीला जाऊन धडकला. त्यावेळी साधारण दीड मिनिट हा मुलगा त्या वीज रोहित्राला चिकटला आणि जखमी झाला. दरम्यान, त्या लहान मुलावर बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील कुंभार आळी भागातील बापुराव धारप सभागृहासमोर वीज रोहित्र आहे. शिवाजी महाराज मैदान येथे क्रिकेट किंवा अन्य खेळ नेरळ गावातील मुले खेळत असतात. गुरुवारी (दि. 14) नोव्हेंबर रोजी सकाळी शिवाजी महाराज मैदानात क्रिकेट खेळत असलेल्या मुलांचा चेंडू उडून मैदानाबाहेर उडाला. नेमका हा चेंडू धारप सभागृहाच्या बाहेर असलेल्या वीज रोहित्रामध्ये जाऊन पडला. त्यामुळे क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमधील मनीष धर्मेश पाटील हा 13 वर्षांचा मुलगा चेंडू शोधत असताना वीज रोहित्राजवळ गेला. त्या ठिकाणी लाल रंगाचा चेंडू दिसल्यावर मनीष तो चेंडू चालण्यासाठी खाली वाकला आणि विजेच्या झटक्याने त्या वीज रोहित्राला चिकटला. त्यानंतर साधारण दीड ते दोन मिनिट हा तरुण वीज रोहित्र यास चिकटून राहिला होता. शेवटी महत प्रयासाने मनीष पाटीलला तेथून खेचून काढण्यात आले आणि त्याला तात्काळ जखमी अवस्थेत नेरळ गावातील डॉ. शेवाळे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्या मुलाची प्रकृती अस्वस्थ असल्याने तात्काळ बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले.
विजेचा धक्का लागलेल्या तरुणाला बदलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे ही घटना सकाळी साडेदहा वाजता घडल्यानंतर काही वेळातच महावितरणचे अभियंता हिंगणकर आणि वीज कर्मचारी हे तेथे पोहोचले. नेरळ गावातील अशी पहिलीच घटना असून, नेरळ गावातील वीज रोहित्र ही मोठी समस्या असून, लहानग्या मुलांसाठी ही जीवघेणी कसरत असल्याचे बोलले जात आहे. त्या मुलाचे वडील हे दत्त मठामध्ये पुजारी असून, ते मूळचे बदलापूर येथील आहेत.