रायगडात बळीराज गुंतला भातलावणीत

पारंपरिकपेक्षा आधुनिकतेवर भर

| अलिबाग | प्रतिनिधी |

लांबलेल्या पावसामुळे भात लावणीची कामेदेखील यंदा उशीरा सुरू झाली आहेत. अलिबाग, पोलादपूर, तळा, रोहा आदी तालुक्यात भात लावणीची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत तीन टक्के लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. पारंपारिक भात लागवडीपेक्षा आधुनिक पध्दतीने भात लागवड करण्यावर कृषी विभागाने भर दिला आहे. एकूण तीन हजार 180 हेक्टर क्षेत्रामध्ये प्रात्यक्षिकाचे नियोजन केले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस 24 जूनपासून सुरु झाला आहे. भाताच्या रोपांनी वाढीसाठी जोर धरला आहे. भात लावणीसाठी पोषक वातावरण असल्याने ज्या भागात भाताची रोप लावणी योग्य तयार झाली आहेत. त्या भागात लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. भात लावणीची लगबग अलिबागसह रोहा, पोलादपूर आदी तालुक्यांमध्ये सुरु झाली आहे. शेतकऱ्यांसह मजूरकर भात लावणीच्या कामामध्ये मग्न असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र पारंपरिक भात लागवडीमुळे भाताचे उत्पादन कमी होते. शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला चालना मिळावी. यासाठी कृषी विभागाने आधुनिक भात लागवडीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील तीन हजार 180 हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवडीचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. त्यात ड्रम सिडर 315 हेक्टर, यंत्राद्वारे 800 हेक्टर, सगुणा 465 हेक्टर व चारसुत्री भात लागवड 1500 हेक्टर क्षेत्रामध्ये करण्याचे नियोजन केले आहे. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक याच्या मदतीने जनजागृती करून आधुनिक पध्दतीने भात लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

चार सुत्री भात लागवड
जिल्हयात पारंपारिक पध्दतीने शेती केली जात आहे . त्यामुळे वेळ व पैसाही जादा खर्च होऊ लागला. त्यात उत्पादन पाहिजे तसे मिळत नाही. शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी कृषी विभागाने कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकाच्या मदतीने चार सुत्री पध्दतीचे प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हयात1500 हेक्टर क्षेत्रामध्ये हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. यामध्ये भात पिकांच्या अवशेषांचा फेर वापर, गिरीपुष्पाचा वापर, नियंत्रित लागवड, युरिया ब्रिकेटचा वापर अशी ही चार सुत्री पध्दत आहे. भाताच्या रोपांना सिलीकॉन या उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा होणे , रोपे निरोगी व कणखर बनने. पिकांच्या अंगी रोग, कीड यांना प्रतिकार करण्याची शक्ती येणे. जमीनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणे. बियाणांचा, रोपे तयार करण्याचा व लावणीचा खर्च कमी होणे. खत कमी लागणे. प्रदुषण टाळणे व पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होणे असा फायदा या चार सुत्री भात लागवडीमुळे होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version