जुन्या मशिनरी भंगाराच्या भावात
। खोपोली । प्रतिनिधी ।
राज्यात दुध उत्पादनाला एकिकडे चालना दिली जात असतानाच दुसरीकडे 40 वर्षे जुन्या अरेच्या डेअरीत दुध संकलन व पिशवी बंद दुध विक्री पुर्णपणे बंद झाले आहे. यामूळे रायगडातील शेतकर्यांचा शेतीपूरक व्यवसाय बंद झाला आहे. तसेच शासनाच्या खोपोली येथील आरे दुध डेअरी मधील काही मशीनरी व भंगाराची विक्री करण्यात आली असून हि दुध डेअरी फक्त वास्तू रुपात उभी आहे. इमारत पूर्ण जिर्ण झाल्याने कोसळण्याच्या स्थितीत उभी आहे.
महाराष्ट्रात दोन कोटी लिटर पेक्षा जास्त दुधाचे उत्पादन होते. मात्र, रायगडात दुध व्यवसायाला घरघर लागल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 134 दुध संस्थांसह 2 दुध संघांच्या केंद्राचे शटर मागील काही महिन्यांपासून बंद झाले आहेत. पनवेल व पेण तालुक्यातील प्रत्येकी 1 असे 2 जिल्हा दुध संघ दिवाळखोरीत तर दुध संस्थानातील खालापुरातील 5, रोहा 8, अलिबाग 5, उरण 4, पेण 10, पनवेल 19, कर्जत 15, सुधागड 20, मुरुड 2, माणगाव 10, महाड 26, म्हसळा 1 आणि पोलादरातील 9 दुध संस्था बंद झाल्या आहेत. जिल्ह्यात 21 दुध संस्था पैकी कर्जत 3, खालापूर 1, माणगाव 1, रोहा 3, पाली-सुधागड 7, पनवेल 1, पेण 1, अलिबाग 2, महाड 2 अश्या दुध संस्था सुरु असून फक्त नऊ संस्था दुध संकलनात क्रियाशील आहेत. आणि या संस्था ही शेवटची घटका मोजत आहेत. शासनाने प्रत्येक जिल्हातील वाढीव दुधाची मागणी पूर्ण करता यावी आणि घटलेल्या दुधाळ जनावरांच्या संख्येतही वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक दुग्धशाळाविकास उपवन प्रकल्पांतर्गत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात 2 प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय जिल्ह्यात सध्या कुठे आहे, याच्या शोधात नागरिक आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील 54 दुध डेअरी मधून संभाजीनगर येथील जैस्वाल ठेकेदाराने भंगार काढण्याचा ठेका घेतला असून खोपोली डेअरी मधील भंगार 10 दिवसांपूर्वी काढण्यात आला आहे. आता फक्त काही मशिनरी शाबूत असून मागील वर्षभरापासून उत्पादन बंद असल्याने भंगाराच्या भावात जाण्याच्या स्थितीत आहेत.







