शाहांच्या शाही भोजनाचा धसका
| रायगड | प्रतिनिधी |
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या शनिवारी (दि.12) रायगडच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या या दौर्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शाहांना आपल्या घरी पाहुणचारासाठी निमंत्रण दिले असून, ते त्यांनी स्वीकारले आहे. शाहा दुपारचे जेवण खा. तटकरे यांच्या घरी करणार आहेत. शाहांच्या घरी स्नेहभोजनास जाण्याच्या कार्यक्रमाआधीच महायुतीमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुतारवाडीतील जेवणाच्या शाही टेबलवर तर सुटणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून, याचा रायगडातील शिंदे गटाच्या मंत्री व आमदारांनी धसका घेतल्याची चर्चा आहे.
भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री न केल्यास रायगडमध्ये असंतोष भडकू शकतो, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. राज्यात सरकार स्थापन होऊन चार महिने झाले तरी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षांकडून रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा केला जातोय. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
अमित शाह यांच्या दौर्यानंतर रायगडला न्याय मिळेल, असा विश्वासही शिंदेंच्या आमदारांनी व्यक्त केला. “ते कुणाच्या घरी जेवायला गेले, यापेक्षा ते शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत, हे जास्त महत्त्वाचे आहे,“ असंही त्यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांची धाकधूक वाढलेय, एवढे मात्र निश्चित. पालकमंत्रीपद हा काही भातुकलीचा खेळ नाही, वरिष्ठ नेत्यांनीही हे समजून घेतलं पाहिजे, असे सांगत महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, याची जाणीव करुन दिली. दरम्यान, शाह यांच्या दौर्यापूर्वीच रायगडात महायुतीतील अंतर्गत तणाव उफाळून आला आहे. आता नजर आहे अमित शाह यांच्या निर्णयाकडे रायगडला न्याय मिळतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.