। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडयातील प्रख्यात डॉ. मुकूंद राजाराम साठ्ये यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. मुकूंद साठये यांच्या जन्म 19 मे 1948 मध्ये पुणे येथे झाला. त्यांनी माध्यमिक शिक्षण ठाणे येथे पूर्ण केले. तर ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज येथे वैद्यकीय शिक्षण एमबीबीएसपर्यंत 1972 रोजी पूर्ण केले. सन 1971 साली बांगलादेश युध्दानंतर असंख्य निर्वासीत पश्चिम बंगाल सीमेलगत गावात आले. त्यावेळी विविध साथीचे रोग पसरत होते. अशावेळी भारत सरकार व रेडक्रॉस यांनी डॉक्टराचा चमू कूच बिहार जिल्ह्यातील जमादार बोश गावी पाठविला होता. यामध्ये डॉ. मुकूंद साठ्ये यांचाही समावेश होता. या चमुचे बांगला सिमेवर जाताना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग त्यांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आले होते. सहा महिने सिमेवर रूग्ण सेवा केली. त्यानंतर तेथून परतल्यावर राज्यपालांनी राजभवनावर त्यांना चहापानास आमंत्रीत करून त्याचा यथोचीत सत्कार केला. त्यानंतर 1974 पर्यंत दोन वर्षे पोलादपुर येथील सरकारी प्रायमरी हेल्थ केअर सेंटर येथे रूग्ण सेवा केली. पुढे त्यांनी सन 1974 पासून 2024 पर्यंत रेवदंडा येथे प्रायव्हेट प्रॅक्टीस केली.
बापूसाहेब नेने फांउडेशनच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. मुकूंद साठ्ये यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, कोरोना काळातील सेवाकार्यासाठी कृतज्ञता म्हणून रेवदंडा ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच्या वाटचालीत त्यांची सहधर्मचारीणी माधूरी साठ्ये यांची उत्तम साथ लाभली. तसेच, डॉक्टरांचे सहाय्यक रमाकांत घरत यांनीही पन्नास वर्षे सचोटीने त्यांचे समवेत काम केले. काही वर्षे ते रेवदंडा डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.