| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पीएनपी नाट्यगृहात पीएनपी कलाविकास मंडळ अंतर्गत ग्रामीण रंगभूमी आयोजित नाट्यप्रभा हा ग्रामीण नाट्यमहोत्सव येत्या 18 मे पासून रंगणार आहे. ग्रामीण भागातील नाट्यचळवळीला नवसंजीवनी देणे आणि या कलावंतांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे, अशी माहिती पीएनपी नाट्यगृह उपाध्यक्ष, विक्रांत वार्डे यांनी दिली.
ग्रामीण नाटकं ही आपल्या संस्कृतीची मुळं आहेत. गावागावात जपली गेलेली ही परंपरा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या भावना, संघर्ष आणि वास्तव मांडणारी एक प्रभावी माध्यम आहे. मात्र, अनेकदा या नाटकांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. हाच विचार लक्षात घेऊन नाट्यप्रभा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना व्यावसायिक नाटकांप्रमाणे भव्य आणि दर्जेदार रंगमंच उपलब्ध करून दिला जात आहे. या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण कलाकारांना त्या रंगमंचावर काम करण्याची संधी मिळणार आहे, ज्या रंगमंचावर अनेक नामवंत आणि प्रतिभावान कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ही संधी प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची ठरणार आहे असे विक्रांत वार्डे यांनी सांगितले.
प्रत्येक नाटकाला अनुदान देण्याचा उपक्रम राबवण्यात आला असून, नाटक तिकीट पद्धतीवर सादर केले जाणार आहे. आपलं नाटक तिकीटावर आहे ही भावना कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच अत्यंत नाममात्र देणगीमूल्यात तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातून मिळणारा संपूर्ण निधी संबंधित नाट्यमंडळींनाच दिला जाणार आहे. नाटकाच्या गुणवत्तेत अधिक भर पडावी यासाठी तज्ञ कलाकारांकडून मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहकार्य देखील दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, अलिबागमधील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा देत आहेत. नेहमीच कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या चित्रलेखा पाटील यांचाही या संपूर्ण महोत्सवाला मोलाचा हातभार लाभणार आहे, असे विक्रांत वार्डे यांनी सांगितले.
या महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रतिक पानकर, ग्रामीण रंगभूमीचे अध्यक्ष राजन पांचाळ, देवेंद्र केळुस्कर, अभिनेते दिग्दर्शक सागर नार्वेकर, संचित पानसरे, तन्वी पाटील, उपासना घोसाळकर, प्रमोद पाटील, नितेश पाटील, ऋषिकेश पडवळ, रवींद्र पाटील, अश्रीता बारसे, संकल्प केळकर, जितेंद्र पाटील, तुषार पाटील (नारंगी) आरती पाठक, हिमालय चोरघे, तुषार पाटील (मेढेखार), विनोद नाईक, अमोल मिठाग्री, दीपक काळेल, अनिष मिठाग्री, मयूर मोरे, साहिल पाटील, यश बनसोडे आणि सर्व सहकारी मनापासून मेहनत घेत आहेत. त्यांच्या या अथक परिश्रमांमुळेच हा महोत्सव अधिक भव्य आणि यशस्वी होणार आहे.
हा महोत्सव केवळ नाटक सादर करण्यापुरता मर्यादित नसून, ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे प्रत्येक रसिक प्रेक्षकाने शक्यतो या नाटकांना उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, ही अपेक्षा आहे. आपण सर्वांनी या रंगदेवतेच्या पालखीचे खांदेकरी व्हावे. कारण, रंगभूमी जिवंत राहिली पाहिजे याची आपण केवळ चर्चा करत नाही, तर त्यासाठी कृतीही करतो, हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. एक कलाकार, एक रसिक आणि एक जाणकार म्हणून आपण सर्वजण या चळवळीत सहभागी होऊया आणि ग्रामीण रंगभूमीचा पताका उंचावूया, असे आवाहन पीएनपी नाट्यगृह उपाध्यक्ष, विक्रांत वार्डे यांनी केले.







