आरसीएफमध्ये प्रसिध्द अभिनेते किशोर कदम सांगणार सिनेसृष्टीतील अनुभव

| अलिबाग | प्रतिनिधी |
स्थानिय लोकाधिकार समिती, आरसीएफ थळच्या वतीने आरसीएफ कुरुळ वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये मंगळवारी (दि. २१) संध्याकाळी ६.३० वाजता सुविख्यात अभिनेते, कवी किशोर कदम ‘सौमित्र’ यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आरसीएफ कर्मचारी स्थानिय लोकाधिकार समिती थळ तर्फे दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी थोर साहित्यीक वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने दरवर्षी मराठी भाषा संवर्धंनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर, गरजूंना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच कर्मचार्‍यांच्या भरती, बढती, बदलीसाठी सतत कार्यरत राहणे यांसारखे विविध कार्यक्रम वर्षभर राबविले जातात.

या वर्षीदेखील २७ फेब्रुवारीला मराठी भाषादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन स्थानिय लोकाधिकार समिति तसेच आर. सी. एफ. लि. यांच्यामार्फत करण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून दि. २१ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध कवी सिने अभिनेते सौमित्र उर्फ किशोर कदम यांची सिनेक्षेत्रातील अनुभव कथन करणारी प्रकट मुलाखत आर. सी. एफ. कॉलनीतील कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित केली आहे. सदर कार्यक्रमा दरम्यान दैनिक कृषीवलचे मुख्य संपादक राजेंद्र साठे हे किशोर कदम यांच्याशी सुसंवाद साधून त्यांची साहित्यिक आणि अभिनेते म्हणून कारकीर्द रसिकांसमोर उलगडतील. अलिबाग परिसरातील साहित्य, सिने रसिकांनी या अनोख्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन समितीचे सह-कार्याध्यक्ष ​संजय धारिया यांनी केले आहे.

Exit mobile version