नेणवली शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
तालुक्यातील राजीप शाळा नेणवली येथे विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषा गौरप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचे महत्व व तिची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी, यादृष्टिने शाळेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये माझा आवडता मराठी शब्द या उपक्रमात फलकावर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा मराठी शब्द इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लिहिला यातून विद्यार्थ्यांना चटकन मराठी शब्द आठवतोय का तो नक्की कोणता लिहित आहेत, याचे परीक्षण करण्यात आले. तसेच मराठी कविता गायन उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बालभारती मराठी पुस्तकातील मराठी भाषेवर आणि मराठीचे महत्त्व सांगणार्‍या विविध कवितांचे गायन सामूहिकरित्या सादर करण्यात आले. यामध्ये माय मराठी कुसुमाग्रज यांची गीते कविता यांचे गायन विद्यार्थ्यांनी तालासुरात आणि उत्कृष्टरित्या सादर केले.
ओव्या अभंग सादरीकरण उपक्रमात शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्‍वर, तुकाराम, बहिणाबाई, जनाबाई व मुक्ताई यांच्या ओव्या अभंग आणि रचनांचा काव्य सादरीकरण अगदी वेशभूषेसहित केले. यामुळे विद्यार्थ्यांना संत परंपरा आणि त्याच्या वाड्मय साहित्याची जाणीव झाली.
प्रश्‍नमंजुषा उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची मराठी पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये लेखक, कवी, म्हणी, समानार्थी शब्द आशयावर प्रश्‍न, अलंकारिक शब्द इत्यादीवर आधारित प्रश्‍न विचारून त्यातून तीन क्रमांक निवडण्यात आले. आणि त्यांना बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल तसेच उपशिक्षक राजेंद्र अंबिके आणि गणपत वरगडे यांनी केले.

Exit mobile version