। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
युवा कुस्तीपटू उदित पुरुष फ्रीस्टाइलमध्ये 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचला असून, वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तो विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. तर अन्य तीन भारतीय कुस्तीपटू कांस्यपदकासाठीच्या लढतीत पोहोचले आहेत. उदित अंतिम लढतीत जपानच्या केंटो युमिया याचा सामना करणार आहे. 20 वर्षांखालील गटातील आशियाई विजेता उदित याने देशाची या गटातील कामगिरी चांगली राहील हे निश्चित केले. या गटात रवी दहिया आणि अमन सेहरावत या पैलवानांनी काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. भारताने 57 किलो गटात सलग चारवेळा आशियाई विजेतेपद पटकावले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवीने 2020, 2021 मध्ये आणि अमनने 2023मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. वरिष्ठ पातळीवरील हे उदितचे दुसरे पदक असेल. त्याने 2022मध्ये ट्यूनिशियात यूडब्ल्यूडब्ल्यू रँकिंग सिरीजमध्ये रौप्यपदक पटकावले होते. उदितसाठी पहिल्या फेरीतील सामना कठीण होता. त्यात उदितने इराणच्या इब्राहिम माहदी खरी याला 10-8 असे पराभूत केले. त्यानंतर त्याने स्थानिक दावेदार अल्माज समानबेकोव याला 6-4 असे पराभूत करत उपांत्य फेरीत कोरियाच्या कुम हयोक किम याच्यावर 4-3 असा विजय मिळवला. चाचणीत बजरंग पुनियाला पराभूत करणारा रोहित कुमार (65 किलो), अभिमन्यू (70 किलो) आणि विकी (97 किलो) उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत खेळणार आहेत. परविंदर सिंह या एकमेव भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी पदकाच्या फेरीत पोहोचण्यात अपयश आले.