पोलादपुरमध्ये महामार्ग समस्येच्या विळख्यात

ठेकेदाराच्या मनमानी विरोधात नागरिकांमध्ये संताप
। महाड । प्रतिनिधी ।
पोलादपुर शहरा जवळ महामाार्गाच्या चौपदीकरणाचे काम सुरु असुन या कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि एलअ‍ॅडटी कंपनी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मुसळधार पावसामध्ये सुरु असलेल्या महामार्गाच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे, मातीच भराव, ढिगारे यामुळे वाहतुक समस्यांमध्ये वाढ झाली असल्याने स्थानिक प्रशासनाने या समस्या सोडवाव्यात अशी मागणी पोलादपुर तालुका संघर्ष समितीतर्फे केली जात आहे.

महाड आणि पोलादपुर तालुक्यातील महामार्ग चोपदीकरणाचे काम अंतिम टप्यामध्ये आलेले असताना पोलादपुर बायपास आणि कशेडी घाटातील बोगद्याचे काम सुरु आहे. पोलादपुर शहराजवळ सुरु असलेल्या कामामुळे नागरी समस्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. रस्त्याचे काम केले जात असताना नागरिकांना कोणत्याही स्वरुपाची अडचण येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आलेले असताना ठेकेदार कंपनीकडून नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मुसळधार पावसामध्ये अंडरपास ब्रॅकेट करीता करण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने माती कोसळून वाहतुककोंडी होत आहे. त्याच बरोबर एका बाजुने खुल्या असलेल्या सर्व्हिस रोडमुळे अवजड वाहन चालकांना आपली वाहाने चालविणे धोक्याचे झाले आहे. त्याच बरोबर संबधित ठेकेदाराने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच सोय केलेली नाही. त्याचा परिणाम रस्त्यावर पाणी साठून परिसर जलमय झाला असुन अपघात होत आहेत. महामार्गावर निर्माण होणार्‍या समस्या, रस्त्यावरील खड्डे इत्यादी कामे तातडीने करण्याची मागणी पोलादपुर नागरी संघर्ष समितीकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version