औद्योगिकरणाच्या नावाखाली नैसर्गिक नाले बुजवण्याचे काम
। उरण । वार्ताहर ।
दरवर्षी पावसाळा आला की अनेक घरांमध्ये पाणी घुसते. त्यामुळे हा विषय आता गंभीर होत असून दिवसेंदिवस घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच औद्योगिकरणाच्या नावाखाली येथील नैसर्गिक ओढे आणि नाले बुंजविले जात आहेत. स्थानिक प्रशासनासह नगररचना विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा उरणकरांमधून होत आहे. तसेच, भविष्यात ओढविणार्या पूर परिस्थितीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक ओढे, नाले बचाव ही मोहीम नागरिकांना सुरू करावी लागणार असल्याची चर्चादेखील पुरग्रस्तांमध्ये होत आहे.
उरण शहरासह तालुक्यातील गावांमध्ये लोक वस्तीत वाढ होत आहे. त्याचबरोबर प्रकल्पांत आणि गोदामांतदेखील वाढ होत आहे. त्यासाठी नैसर्गिक नाले बुजवण्याचे काम झपाट्याने सुरू झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात याचा नाहक त्रास प्रामुख्याने रहिवाशांना जाणवतो. हे नैसर्गिक ओढे, नाले कोण बुंजवत आणि त्यांना बुजवायला परवानगी कोण देतं, असा सवाल दरवर्षी पुरग्रस्तांमधून प्रशासनाला विचारला जातो. उरण नगरपरिषद, सिडको किंवा स्थानिक ग्रामपंचायत तसेच शासनाच्या प्रत्येक खात्यातील नगररचना विभागाकडे शहरातील, गावातील सर्व भूखंडांची माहिती असते. त्यात नैसर्गिक ओढे-नाले कुठून जातात, कोणत्या मार्गे नदीला किंवा खाडीकिनार्याला जुळतात या सर्व प्रकारची माहिती आणि नकाशे त्यांच्याकडे असतात. तरीदेखील नवीन घर बांधणे, प्रकल्प किंवा गोदामे उभारताना ते नाले बुरजवले जातात. ही गोष्ट नगरपरिषद, सिडको, महसूल विभाग, स्थानिक ग्रामपंचायत तसेच नगररचना विभाग हे ओढे-नाले बुंजवणार्यांवर कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.