। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय जनता पार्टीच्यावतीने अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाराची ऑफर देण्यात आली होती. परंतु, एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद पाहिजे असल्याने अजित पवार गटाने राज्यमंत्रीपद नाकारल्याचे बोलले जाते. मोदी सरकार 3.0 सुरु होण्याआधीच घटक पक्षात कुरबुरी सुरु झाल्या आहेत.
अजित पवार गटाला मनाप्रमाणे मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे, हे काही लपलेले नाही. येत्या कालावधीत होणार्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदच दिले जावे, अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी पार पडलेल्या मोदींसह अन्य खासदारांच्या शपथ विधीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. परंतु, कॅबिनेट मंत्री राहिलेल्या व्यक्तीला राज्यमंत्रीपदी बसवणे संयुक्त नसल्याने त्यांनी ही ऑफर नाकारली आहे. सुरुवातीला प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दोघांनाही मंत्रीपद पाहिजे, म्हणून त्यांच्या वाद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर तोडगा म्हणून एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्याची मागणी पवार गटाने केली होती. भाजप राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद देण्यास तयार नसल्याच्याही बातम्या येत होत्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीला नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात का स्थान मिळाले नाही हे स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले, मंत्रीपद प्रफुल्ल पटेलांना द्यायचे की सुनील तटकरेंना द्यायचे याबद्दल आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. आम्ही सर्वांनी मिळून प्रफुल्ल पटेलांचे नाव निश्चित केले आहे. भाजपने आम्हाला राज्यमंत्रीपद देऊ केले होते. पण, प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असल्यामुळे त्यांना पुन्हा राज्यमंत्रीपद देणे चुकीचे वाटते. महाराष्ट्रातून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला देखील मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. परंतु, त्यांनी ती नाकारली आहे. आघाडी सरकारमध्ये सामील होणार्या सर्वच पक्षांचा विचार करावा लागतो. कुण्या एका पक्षासाठी निकष मोडता येत नाही, पण येत्या काळात त्यांचा विचार होणार आहे. राष्ट्रवादीला संधी देण्यात आलेली आहे. परंतु, त्यांनी ती स्वतःहून नाकारलेली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपाला आधीच चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी विविध अटी लादून जेरीस आणले आहे. हे कोठेही उघड झाले नसले तरी, त्यांच्यामध्ये कुरबुरी सुरु असल्याचे बोलले जाते. नायडू आणि नितीश हे दोघेही नेते संधीसाधू नेते म्हणून ओळखले जातात. नायडू यांच्या पक्षाचे 16 तर नितीश कुमार यांच्या पक्षाचे 12 खासदार निवडून आले आहेत. भाजपानंतर नायडू यांच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून महत्वाची मंत्रालये मागण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. नायडू यांचा इतिहास पाहिल्यास त्यांच्या मागण्या कधीच संपत नाही. तसेच, नितीश कुमार कधी पलटी मारतील अशी भीती मोदी सरकारला आहे. त्यामुळे पुढील कालावधीत कुरबुरी वाढण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.