जिल्हा कृषी विभागाकडू अंदाज व्यक्त
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये भातपेरणीची लगबग सुरु झाली आहे. शेतकरी पेरणीच्या कामामध्ये मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 50 टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या पाऊसदेखील पेरणीयोग्य असून, दहा दिवसात शंभर टक्के पेरणीची कामे पूर्ण होणार असल्याचा अंदाज अधीक्षक व जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यामध्ये 95 टक्क्यांहून अधिक शेतकरी पावसाच्या पाण्यावरच भातपिकाची लागवड करतात. कृषी विभागाने यंदा 98 हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड करण्याचे नियोजन केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भात पेरणीला सुरुवात झाली आहे. काही शेतकर्यांना पावसाच्या अगोदर धूळवाफे पेरणी केली. तर काही शेतकर्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु झाल्यावर पेरणीला सुरुवात केली. काही ठिकाणी भाताच्या रोपांनी उगवण केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पडत असलेला पाऊस पेरणीसाठी पोषक आहे. त्यामुळे शेतकरीदेखील पेरणीच्या कामाला लागले आहेत. ही कामे वेगात सुरु आहेत. काहीजण पारंपरिक नांगरणीद्वारे, तर काही शेतकरी नवनवीन अवजारांद्वारे पेरणी करीत आहेत. जिल्ह्यामध्ये भाताच्या एकूण क्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्रामध्ये पेरणी केली जाते. आतापर्यंत 50 टक्के म्हणजे चार हजार 829 हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रामध्ये दहा दिवसांमध्ये भात पेरणीची कामे पूर्ण होतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
शेतकर्यांना प्रात्यक्षिकांसाठी भात बियाणे जिल्ह्यामध्ये भातपिकांमधून शेतकर्यांना चांगले उत्पादन मिळावे यासाठी आत्मा अंतर्गत प्रात्यक्षिकांसाठी विद्यापीठाकडून शेतकर्यांना मोफत बियाणे वितरीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी-6, रत्नागिरी-8, कर्जत-9 या जातीची उत्पादन देणारी बियाणे आतापर्यंत चारशेहून अधिक शेतकर्यांना देण्यात आली आहेत. सध्या 279 एकर क्षेत्रामध्ये याची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
भात पेरणीची कामे वेगात सुरू आहेत. 50 टक्के पेरणीची कामे झाली आहेत. उर्वरित 50 टक्के पेरणीची कामे दहा दिवसांमध्ये पूर्ण होतील. सध्या पेरणीयोग्य पाऊस आहे.
वंदना शिंदे,
अधीक्षक व जिल्हा कृषी अधिकारी,
रायगड