ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू घालणार साधा पोषाख


। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू नॉन ब्रॅण्डेड म्हणजेच साधे कपडे परिधान करून मैदानावर उतरणार आहेत. कारण हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) ली निंग या चिनी कंपनीचे कीट हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुसर्‍या कुठल्याच कंपनीशी ‘आयओए’ने कीटसाठी अद्याप करार केलेला नाही. ‘आयओए’ने टोकियो ऑलिम्पिकसाठी ली निंग कंपनीचे कीट नुकतेच लाँच केले होते. मात्र हिंदुस्थान-चीन दरम्यानचा सीमावाद चिघळलेला असल्यामुळे ‘आयओए’च्या या निर्णयाविरुद्ध देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे ही कीट हटविण्याचा निर्णय घ्यावा लागला.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही ‘आयओए’ला चिनी कंपनीचे कीट रद्द करण्याचा सल्ला दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर चाहते आणि देशवासीयांच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू चिनी कंपनीची कीट घालणार नाहीत, असा निर्णय ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि महासचिव राजीव मेहता यांनी घेतला. त्यामुळे पुढील महिन्यात होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू साध्या पोशाखात उतरतील, असेही त्यांनी सांगितले. मागील गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानी खेळाडूंना बनविण्यात आलेली जर्सी लाँच करण्यात आली होती. ही जर्सी ली निंग या चिनी कंपनीची असल्यामुळे देशभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. सोशल मीडियावर याबद्दल टीकेची झोड उडाली होती. हा प्रचंड विरोध बघून शेवटी ‘आयओए’ला चिनी कंपनीचे कीट रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

नवीन कीट प्रायोजकाच्या शोधात
टोकियो ऑलिम्पिकसाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असला तरी आम्ही ऑलिम्पिक पथकासाठी नवीन कीट प्रायोजक शोधू, असा विश्‍वास हिंदुस्थान ऑलिम्पिक समितीने व्यक्त केला. ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, खरंतर आमच्याकडे फार कमी वेळ आहे. मात्र तरीही आम्ही कीट प्रायोजकासाठी कोणावर दबाव टाकणार नाही. हिंदुस्थानचे ऑलिम्पिक पथक नवे प्रायोजक असलेल्या कीटमध्ये उतरेल की साध्या पोषाखात हे आम्ही या महिनाअखेरीस स्पष्ट करू, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version