। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्याचे महावितरण उपविभागीय कार्यालयात शहरी विभागाचे कामकाज पाहणारे सहाय्यक अभियंता पी.जे. चालिकवार यांच्या मनमानी कारभाराविरोधात विज कामगार महासंघाच्या कर्मचार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील महावितरण कंपनीत अभियंता चालिकवार हे एक वर्षापूर्वी कामावर रुजू झाले आहेत. श्रीवर्धन शहरी विभागाचे कामकाज त्यांच्याकडे आहे. मात्र, कामावर वेळेत न येणे, कंपनी अंतर्गत कामकाजात दुर्लक्ष करणे, अशा अनेक तक्रारी चालिकवार यांच्या विरोधात येत आहेत. दुसरीकडे महावितरण कंपनीच्याच कामगारांची नियमित होणारी हजेरी करण्यात दुर्लक्ष केले जात आहे. त्यातून त्यांना दमदाटी करण्यात येत आहे. यामुळे त्यांना वेळेत वेतन सुद्धा मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळे विज कामगार महासंघाच्या कर्मचार्यांनी चालिकवार यांच्या मनमानी व नियमभाहय कारभाराबाबत बुधवारी (दि.4) श्रीवर्धन उपविभागात बैठक घेण्यात आली. तसेच, आंदोलनाचे पत्र उप कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.