ममदापुर नागरी वस्तीतील रस्ता खड्ड्यात

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ-ममदापुर संकुल विकास प्राधिकरणामधील ममदापुर गाव आणि परिसरात होत असलेल्या नागरीकरण क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्या भागातील रस्त्यांवर खड्डेमय अशी स्थिती असून त्या रस्त्यांच्या बाजूला बनविण्यात येत असलेल्या गटारांची कामे देखील कासवगतीने सुरु असल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत.
नेरळ विकास प्राधिकरणमधील महत्वाचे गाव आहे. त्या गावासाठी स्वतंत्र असलेल्या ग्रामपंचायतमध्ये नेरळ विकास प्राधिकरणच्या माध्यमातून बांधकाम विकसक यांना जादा चटई क्षेत्र मिळत असल्याने ममदापुर गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रहिवाशी क्षेत्र उभे राहत आहे. त्या रहिवाशी क्षेत्रासाठी नगररचना विभागाने स्वतंत्र प्राधिकरण नेमून नेरळ आणि ममदापुर गावासाठी वेगळे अधिकार दिले आहेत. त्यामुळे या भागात रहिवासी क्षेत्र वाढू लागले. त्या बदल्यात जिल्हा प्राधिकरणकडून सोयीसुविधा पुरविण्यासाठी कोणतीही जबाबदारी पार केली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी देखील नेहमीच्या त्रासाला कंटाळले आहेत. या भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. प्राधिकरणच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची कामे सहा वर्षांपूर्वी करण्यात आली होती, मात्र रस्त्यावर चालणारी अवजड वाहनांमुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

Exit mobile version