सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| चौल | प्रतिनिधी |
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबाग-रेवदंडा या मुख्य रस्त्याला नागाव ते शास्त्रीनगर येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक, वाहनचालक प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नागाव-खारगल्लीपासून शास्त्रीनगर, पालव फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भल्या मोठ्या खड्ड्यांनी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. या परिसरातील रस्त्यावरील खड्डे ही दरवर्षीची समस्या आहे. परंतु, यावर अद्याप तरी सार्वजनिका बांधकाम विभागाकडून ठोस अशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेकदा रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहने जोरजोरात आदळत असून, नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहनचालक, प्रवाशांना कंबरदुखीचे दुखणे विनाकरण मागे लागले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सवापूर्वी तरी हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे.
सा.बां.ची टाळाटाळ
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. मोरे यांच्याशी रस्त्याच्या समस्येसंबंधी विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. परंतु, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
- खड्ड्यांमुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ते सुस्थितीत करणे आवश्यक होते. परंतु, त्याकडे दुलर्क्ष केले आहे. आगामी सण-उत्सव लक्षात घेऊन तातडीने रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक आहे. – जितेंद्र पाटील, वाहनचालक