। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. तर प्रशासकीय कामांना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होताच आता पोलिसांचीही कामे वाढणार आहेत.
मुंबईसह राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीसह रजा बंद केल्या आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करत हे आदेश दिले आहेत. रजा बंदीमधून वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणांसाठीच्या रजा वगळण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक 2024 चे राज्य पोलीस समन्वय अधिकारी डॉ. छेरिंग दोरजे यांनी संबंधित आदेश जारी केले. अनुचित घटना घडू नये म्हणून सतर्कतेचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहेत.निवडणूक पार पडेपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय किंवा वैद्यकीय रजा वगळून अन्य कोणत्याही कारणाशिवाय सुट्टी घेता येणार नाही, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.