विश्वविजेत्या इंग्लंडला नवोदित अफगाणिस्तानने पराभूत केल्याच्या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच मंगळवारी हॉलंडने यंदाच्या विश्वचषकात आणखी एक भूकंप केला. यंदाच्या विश्वचषकात संभाव्य विजेता म्हणून ज्या रात्रीत आफ्रिका संघांचे नाव घेतले जात होते, त्याच्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याचा पराक्रम हॉलंडने केला.अफगाणिस्तानची वाटचाल अलिकडे आपण पहात होतो.अब्दुल रशिदसारख्या खेळाडूंचा आयपीएलमधील दबदबा पाहत होतो. हॉलंडच्या बाबतीत असं फारसं कधीच घडलं नव्हतं. खरंतर अलिकडेच उभा होत असलेला हा संघ आहे. दक्षिण आफ्रिकेचाच माजी खेळाडू वॅन उर मर्व्ह, हाच काय तो त्यांच्या संघांतील अनुभवी खेळाडू. भारतीय वंशांचेही खेळाडू या संघात आहेत. फावल्या वेळात क्रिकेट खेळणारे काही व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. या संघात तर उबर-ईटसचा एक डिलिव्हरी बॉयही आहे.
विश्वचषकाच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये नानीबिया आणि स्कॉटलंड यांना हरविल्याचा इतिहास फक्त गाठीशी. आणि हो गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 विश्वचषकात देखील दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याचा केलेला पराक्रमही स्मरणात होता. मात्र यंदाच्या विश्वचषकात फॉर्मात असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांच्या सामन्यात हा संघ पराभूत करेल असे वाटले नव्हते. फुटबॉल प्रेमींच्या या देशात क्रिकेटचा पराक्रम किती प्रोत्साहित करणारा असेल हे मात्र कळणे कठीण आहे. कारण संघांची बांधणी करणे हेच ज्यांच्यापुढे आव्हान होते,त्या संघाकडून असे पराक्रम अपेक्षित करणे चूक होती. तरीही 48 तासातील विश्वचषकातील दुसरा धक्कादायक निकाल लागलाच. विश्वचषकातील त्यांचा कसोटी खेळणाऱ्या देशावरचा हा पहिलाच विजय होता. 1986 पासून आजतागायत विविध विश्वचषक स्पर्धेतील 23 पैकी 20 सामने गमाविणाऱ्या हॉलंडसाठी दक्षिण आफ्रिका संघांवरील विजय मोठाच मानावा लागेल.
ॲडन मार्करम आणि मार्को यान्सन या दोन महत्त्वाच्या फलंदाजांचे बळी घेणारा पॉल व्हॅन मिक्रेन ‘उबर-ईट्स’साठी डिलिव्हरी बॉयचे काम करतो. खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरीप्रमाणेच त्याने काल दक्षिण आफ्रिकेच्या डावात सफाईने गोलंदाजी केली. 5 बाद 82, 6 बाद 112 आणि 7 बाद 140 वरून कर्णधार स्कॉट एडवर्डने 69 चेंडूत नाबाद 78 धावा पटकाविल्या आणि हॉलंडसाठी आशेचे किरण दिसायला लागला. या स्कॉट एडवर्डच्या फलंदाजीत आक्रस्थळेपणा नाही, ताकदीचे प्रदर्शन नाही. पण त्याच्या भात्यातले दोन फटके एकमेकांविरूद्धचे.एका स्वीपचा आणि दुसरा रिव्हर्स स्वीपचा. या दोन फटक्यांनी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मंगळवारी नामोहरम केले.‘बुल डॉग’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंज बंगळूरूचा खेळाडू व्हॅन हक मर्व्हच्या 29 धावा आणि 9 षटकातील 34 धावातील 2 बळी हॉलंडच्या विजयाला हातभार लावणारे होते. डिलिव्हरी बॉय मीक्रेन उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी टाकणारा खेळाडू. 2013 साली केनियाविरूद्ध पदार्पण केल्यापासून त्यांच्या संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला. नामवंत, प्रतिथयश खेळाडूंच्या विकेट काढणे, हीच याची खासियत आहे. इंग्लंडचा डरहॅम कौटींसाठीही तो खेळलाच. ग्लॉस्टरशायचे 2022 च्या हंगामाचे कॉन्ट्रॅक्टरही त्याला मिळाले होते. मात्र पोटासाठी डिलिव्हरी करण्याचे काम करावेच लागते.
विक्रमसिंग हा डावखुरा आघाडीचा फटकेबाज फलंदाज. जालंधर पंजाबचा हा युवक, ॲमस्टरडॅमला आजोबांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मदतीसाठी गेला आणि तेथेच रमला. विश्वचषकात हॉलंडला दाखल करून देण्यात त्याच्या ओमानविरुद्ध पटकाविल्या वेगवान शतकाचा मोठा हात आहे. आंध्रचा तेजा निदामानिरू, याचे क्रिकेट न्यूझीलंडमध्ये, ऑकलंड येथे फुलले. हॉलंडमध्ये स्थायिक झाला आणि त्यांच्या संघातही स्थिरावला. गतसाली विंडिजविरूद्धच्या नाबाद 55 धावांनी त्याचे विश्वचषक संघांतील स्थान बळकट केले. त्याआधी झिम्बावेविरूद्धचे शतक त्याच्या दर्जाची साक्ष देणारे ठरले. ऑफ स्पिनर आर्यन दत्त याच्या फिरकीपुढे नामवंत फलंदाजांची देखील भंबेरी उडते. निकोलस पुरण, क्लिंटन डिकॉक, बाबर आझम, जेरून रॉय यांचे बळी त्याच्या नावावर आहेत. अशा या बहुरंगी, बहुढंगी आणि बहुद्देशीय खेळाडूंच्या संघाने यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला हरविण्याचा भीम पराक्रम केलाय.
Email: vinayakdalvi41@gmail.com