फणसाड अभयारण्य सुरक्षित राहण्यासाठी कामाला वेग
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात सुप्रसिद्ध असे फणसाड अभयारण्य आहे. सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभ्यारण्याची व्याप्ती आहे. सदरचे अभयारण्य आगीपासून सुरक्षित राहावे यासाठी फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे. फणसाड अभयारण्याच्या आजूबाजूला रस्त्याचा परिसर असून, वाटसरू यांच्याकडून सिगारेट अथवा माचीसची कांडी ही वणव्याला कारणीभूत ठरू नये यासाठी सुके गवत व झाडीझुडपे जाळून टाकली जातात.
वनरक्षक अरुण पाटील यांनी विहूर आदिवासी वाडीतील तरुणाशी संपर्क साधून जळीत रेषा काढण्यासाठी मदत मागितली. त्याप्रमाणे आदिवासी वाडीतील असंख्य तरुणांनी रस्त्यावर उतरून जळीत रेषा काढण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी विहूर आदिवासी वाडीचे अध्यक्ष लक्ष्मण पवार, उपाध्यक्ष संजय वाघमारे यांच्यासह असंख्य तरुण या कामात सहभागी झाले होते. नवाबांचा राजवाडा ते विहूर परिसर या भागात जळीत रेषा काढून फणसाड अभयारण्य सुरक्षित करण्यात येत आहे.
विहूर आदिवासीवाडीत तरुणांनी केली जाळरेषा
