नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगावमध्ये डिसेंबर महिन्यात रानगव्याचा शिरकाव झाला होता. यावेळी गावामध्ये एका ग्रामस्थावर हल्ला करून हा पसार झाला होता. यामध्ये हा ग्रामस्थ किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर आली होती. आणि आता या रानगव्यांचे दर्शन मुरुड राजवाडा परिसरात होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अभयारण्य म्हणजेच मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य आहे. या अभयारण्यात काही वर्षांपूर्वी रानवे सोडले होते. आता या रानगव्यांची संख्या वाढत असल्याने त्यांचा तालुक्यामध्ये संचारसुद्धा वाढला आहे. फणसाड अभयारण्य व नांदगाव लागून असल्याने हे रानगवे गावात शिरले होते. आता ते मुरुड शहरानजीक दिसू लागले आहेत.
मुरुड तालुक्यातील नांदगावच्या समुद्रकिनारी डिसेंबर महिन्यात पहाटे ग्रामस्थांना गव्याचे दर्शन झाले. सदर गवा हा गावालगतच्या फणसाड अभयारण्यातून आला असून, शुक्रवारी सकाळी तो नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील खालचा मोहल्ला परिसरातील गौतम दाबणे यांच्या नारळ-सुपारी बागेतून रस्त्यावर आला. दरम्यान, एका व्यक्तीला त्याने टक्कर मारुन तो नांदगाव समुद्रकिनारी पळून गेला. त्यानंतर त्याने समुद्रकिनार्यासह नजीकच्या बागांतून हुंदडत परत फणसाड अभयारण्याकडे कूच केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर मुरुड राजवाडा परिसरात रानगव्याचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.