| आगरदांडा | प्रतिनिधी |
सागरमाला व राज्य शासन यांच्या माध्यमातून नऊ कोटी रुपये निधी मंजूर करून महारष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून मुरूड तालुक्यातील एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदरातील जेट्टी विकसित केली असून, ही जेट्टी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाली आहे. यामुळे ऐतिहासिक जंजिरा व पद्मदुर्ग किल्ल्यात पर्यटकांना ये-जा करण्यासाठी प्रवास सुखकर होणार आहे. तसेच स्थानिक कोळी बांधवांना आपल्या होड्या लावण्याकरिता या जेट्टीचा चांगला उपयोग होणार असल्याने कोळी मच्छिमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मागील जेट्टी रुंदी व उंचीने कमी असल्याने ओहोटीच्या वेळी बोटी किनार्याला लागणे खूप कठीण होत असे. अशा वेळी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना किनार्यावर येण्यासाठी खूप त्रासदायक होत होते. याचा सर्वच स्थरावर विचार करून शासनाने नवीन जेट्टी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार खोल समुद्रात 100 मीटर लांबी व 10 मीटर रुंदीची जेट्टी उभारण्यात आल्याने ओहोटीच्या वेळेस आता प्रवास सुखकर होणार आहे.
खोरा बंदर जेट्टीच्या कामास 13 मार्च 2023 पासून कामाला सुरुवात करण्यात आली होती. हे काम 25 महिन्यांत पूर्ण झाले असून, ते द.एच.कंपनी पनवेल या ठेकेदाराला देण्यात आले होते.
मेरीटाईम बोर्डाने ही जेट्टी सुरू करण्यास मान्यता दिल्याने आनंद आहे. बोट जेट्टी जवळ आल्यावर दोरखंडाने बोट थांबवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हीच परिस्थितीत राहिली तर पुन्हा जुन्या जेट्टीचा वापर करावा लागेल, अशी प्रतिक्रिया बोट चालकांनी दिली.