। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि.1) पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांच्यात झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील मुंबई वाहिनीवर पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या खाद्यतेल वाहून नेणाऱ्या कंटेनरला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेच्या वेळी शेजारच्या मार्गिकेतून जात असलेल्या एर्टिगा कारलाही ट्रकची धडक बसली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की तांदूळ भरलेला ट्रक आणि कंटेनर दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून, एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (80), मुकिंदा सस्ते (56) आणि महेंद्र पाल (39) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक बंद ठेवण्याची वेळ आली. लोणावळ्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग लिंकची वाहतूक द्रुतगती मार्गाने आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने वळवण्यात आली. परिणामी दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. आता अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यात आली असून, मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.






