| पनवेल | वार्ताहर |
पालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 (क) मधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले दिसत आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सखाराम पाटील यांनी या प्रभागात दिलेले ‘तगडे आव्हान’ स्थानिक राजकारणाची गणिते बदलू शकते. सफरचंद हे निवडणुक चिन्ह घेऊन निवडणूक लढवत असलेले सखाराम पाटील यांचा प्रभागातील दांडगा जनसंपर्क ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते. सामान्य नागरिकांच्या सुख-दुखात सहभागी होण्यामुळे त्यांनी स्वतःचे एक हक्काचे ‘व्होट बँक’ तयार केले आहे. अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या किंवा वरचष्मा असलेल्या उमेदवारांसमोर पाटील यांनी उभे केलेले आव्हान हे केवळ व्यक्तीविरोधात नसून ते प्रस्थापित कार्यपद्धतीविरोधात असल्याची चर्चा प्रभागात आहे. सखाराम पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रभागातील प्रत्येक कोपरा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी सोशल मीडिया कॅम्पेन राबवले जात आहे. रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. प्रभाग क्रमांक 11 (क) मधील मतदारांची आकडेवारी पाहता, पाटील यांना मिळणारा पाठिंबा हा ठराविक वस्त्यांपुरता मर्यादित न राहता सर्वसमावेशक होताना दिसत आहे, ज्यामुळे विरोधकांची चिंता वाढली आहे. थोडक्यात सांगायचे तर प्रभाग 11 (क) ची निवडणूक ही आता केवळ औपचारिकता राहिलेली नसून, ती सखाराम पाटील यांच्या आक्रमक पवित्रामुळे अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
पंचायत समिती उपसभापती तसेच पनवेल पालिका स्विकृत नगरसेवक कार्यरत असताना माजी आमदार विवेकानंद पाटील व माजी आमदार बाळाराम पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. प्रत्येक प्रश्नाला, अडचणीला आणि प्रत्येक अपेक्षेला स्वतःची समजून न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. माझे नाते कधीही केवळ निवडणुकीपुरते न राहता नेहमी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे.
– सखाराम रघुनाथ पाटील,
उमेदवार प्रभाग क्रमांक 11 (क)







