कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र शस्त्रक्रिया सेंटरसह इतर सुविधा उपलब्ध
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरामध्ये एका दिवसात विविध कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळे आयोजित करण्यात आले. अलिबाग नगरपरिषदेने पुढाकार घेत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी शहरामध्ये अद्ययावत असे निर्बींजीकरण केंद्र करण्यात आले आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि.30) नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेविका ॲड. निलम हजारे, अश्विनी ठोसर, शैला भगत, योजना पाटील, ॲड.निवेदिता वाघमारे, आनंद पाटील, अनिल चोपडा, समीर ठाकूर, संदीप पालकर, जमाल सय्यद, ॲड.ऋषीकेश माळी, संतोष गुरव, सागर भगत, जनता शिक्षण मंडळाच्या प्राचार्या सोनाली पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे, बांधकाम अभियंता संतोष मुंडे, पेट फोर्स पुणे येथील संस्था प्रमुख विनोद साळवी, डॉ. हर्ष पाल, आदी मान्यवरांसह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पेट फोर्स पुणे येथील संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.
अलिबाग शहरातील समुद्रकिनारी असलेल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना या केंद्रात आणणे, त्यांना रेबीजचे लसीकरण करणे, तसेच शस्त्रक्रिया करणे. पाच दिवस त्यांच्यावर उपचार करणे त्यानंतर त्यांना निर्बीजीकरण झाल्यावर सोडण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी पंधराहून अधिक कुत्र्यांना पेट फोर्स संस्थेमार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्या उपचार व लसीकरण करून त्यांना पुन्हा सोडले जाणार आहे. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. एकत्र येऊन हल्लादेखील करण्याचे संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी अलिबागमध्ये सर्व सोयी सुविधांयुक्त असे निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. दरम्यान अलिबाग शहरात अद्ययावत अशा सोयी सुविधांयुक्त वाहनांचा लोकार्पण सोहळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आला. शववाहिका आणि सेप्टीक टाकी मैला उपसा वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अलिबागचे बांधकाम सभापती प्रशांत नाईक, प्रदिप नाईक, सुषमा पाटील, संध्या पालवणकर आदीदेखील उपस्थित होते.
