‌‘पीएनपी’च्या प्रभाविष्कार सोहळ्यास प्रारंभ

यश पादाक्रांत करण्यासाठी सराव महत्त्वाचा , आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू संजय उळेंचे प्रतिपादन


| अलिबाग | प्रतिनिधी|

कोणतीही क्रीडा स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये आपण एक व्हिजन ठेवून काम केले पाहिजे, तसेच स्पर्धेत यश पादाक्रांत करण्यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. जे विद्यार्थी नित्यनियमित सराव करतात, तेच विजयी होतात, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू आणि अलिबागचे सुपुत्र संजय उळे यांनी केले. प्रभाकर पाटील शैक्षणिक संकुलाच्या प्रभाविष्कार महोत्सवाचा प्रारंभ श्री. उळे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करुन करण्यात आला. त्यावेळी त्यांनी एकाग्रता आणि वेळेचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

प्रभाविष्कार महोत्सवाची सुरुवात मंगळवारी (दि. 19) क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाने झाली. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शरीरसौष्ठवपटू आणि अलिबागचे सुपुत्र संजय उळे यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष व माध्यमिक शाळा वेश्वीचे मुख्याध्यापक निलेश मगर, पीएनपी कॉलेजचे संचालक प्रा. विक्रांत वार्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून झाले. प्रा. विक्रांत वार्डे यांनी मशाल प्रज्वलित करून मशाल रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये संकुलातील सीनियर कॉलेज, ज्युनिअर कॉलेज, होली चाइल्ड-स्टेट आणि सीबीएससी बोर्ड, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच बीएड महाविद्यालय सहभागी झाले होते. अलिबाग शहरातील पीएनपी मध्यवर्ती कार्यालयापासून रॅलीस प्रारंभ होऊन कृषीवल प्रेस, रेवस बायपास, जोगळेकर नाका यामार्गे रॅलीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या मशालीचे आरोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय उळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात खेळाडूंना शपथ देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश मोरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाच्या प्रभाविष्कार सोहळ्याच्या उज्ज्वल परंपरेचा धांडोळा घेतला. तसेच चालू शैक्षणिक वर्षातील क्रीडा क्षेत्रामध्ये देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या तसेच जिल्हा, विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले.

प्रभाविष्कर क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर यांनी प्रभाविष्कार सोहळ्याची मध्यवर्ती भूमिका स्पष्ट केली. कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक या क्षेत्रातील आविष्कार म्हणजे प्रभाविष्कार होय. पुढील पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यास सर्व विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. मगर यांनी केले.
शेवटी आभार होली चाइल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले यांनी मानले. संकुलातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यास्तव प्रातिनिधिक स्वरूपात बक्षिसे देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.विक्रांत वार्डे, मुख्याध्यापक निलेश मगर, सीनियर कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. रवींद्र पाटील व उपप्राचार्य प्रा. निशिकांत कोळसे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, होली चाइल्ड सी.बी.एस.सी.च्या मुख्याध्यापिका सौ. वेनी, उपमुख्याध्यापिका सौ. सदफ, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश मोरे, पीएनपी शैक्षणिक संकुलातील मनीषा काळे, श्रुती सुतार, राजश्री पाटील यांनी मेहनत घेतली. त्याचप्रमाणे क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजेश म्हात्रे, अक्षय डाकी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Exit mobile version