शेकापतर्फे न्हावे येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सभागृहाचे उद्घाटन, 400 लाभार्थ्यांना मोफत चष्मेवाटप

| रोहा | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेच्या उदात्त हेतूने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने रविवारी रोहा तालुक्यातील न्हावे येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शेकापच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जय हनुमान मित्र मंडळ भायतांडेल आळी येथील सभागृहाचेदेखील यावेळी उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, मोफत चष्मेवाटप कार्यक्रम पार पडला. त्याचा जवळपास 400 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.


यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, रुग्णवाहिकाचा पंचक्रोशीतील रुग्णांना फायदा होईल, वेळेवर रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे सोयीस्कर होईल, तसेच जय हनुमान मित्र मंडळ सभागृहामार्फत तरुणाईला विविध सामाजिक उपक्रम राबविणे शक्य होईल. यावेळी मोफत नेत्रतपासणी करून चष्मेवाटपाचा लाभ ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील न्हावे, नवखार, सोनखार या गावातील 400 लाभार्थ्यांनी घेतला.



यावेळी हेमंत ठाकूर, नरेश यादव, नंदू मात्रे, संदेश विचारे, गोपीनाथ गंभे, शंकरराव म्हसकर, अमित देशपांडे, नेत्र चिकित्सक डॉ. अरविंद माटल, अशोक विचारे, राज जोशी, राजाभाऊ सानप, काशिनाथ भोईर, नारायण गायकर, राजश्री शाबासकर, विकास तांडेल, सदानंद पाटील, सुरेश पोसतांडेल, महादेव शाबासकर, विजय कासकर, विनायक कटोरे, हर्षली सर्लेकर, कमलाकर डबीर, किरण तांडेल, मंगेश पाटील, गोविंद तांडेल, विजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version