| नेरळ | वार्ताहर |
डॉ. एन.वाय. तासगावकर मेडिकल कॉलेज परिसरात असलेल्या रायगड हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये कॅथ लॅब सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. या लॅबमुळे रुग्णांवर हृदयविकार शस्त्रक्रिया तसेच एंजीओग्राफी आणि एंजीओप्लास्टी आदी शस्त्रक्रिया करणे सोपे जाणार आहे.
कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ येथे रायगड हॉस्पिटल आहे. रुग्णालयात दररोज 200हून अधिक रुग्ण वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि तपासणीसाठी येत असतात. तेथे सर्व प्रकारचे उपचार रुग्णांवर व्हावेत यासाठी कॅथलॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे लोकार्पण रायगड हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल कॉलेजचे संस्थापक डॉ. एन. वाय. तासगावकर आणि वंदना नंदकुमार तासगावकर यांच्या हस्ते फीत कापून झाले. यावेळी मेडिकल संचालक डॉ. संजय तार्लेकर तसेच मृदल तासगावकर, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक सबनिस, मेडिकल अधीक्षक डॉ. हुबु जाधव तसेच डॉ.सागर सोळंकी आदी उपस्थित होते.







