| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील चेंढरे येथे जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका ही नूतन वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. या नवीन वास्तूचे उद्घाटन सोमवारी (दि.3) रायगड किल्ला जतन, संवर्धन व विकास आराखडा प्राधिकरण अध्यक्ष छत्रपती संभाजी शाहू आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी पुस्तकांचा संच भेट म्हणून विनामूल्य देण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सध्याचे विभागीय कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यांमधून जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांकरिता गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन, ऑनलाईन मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती.
याचेच पुढचे पाऊल म्हणून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अभ्यास केंद्र मिळावे, या हेतूने जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र व अभ्यासिका उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.