झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन

आदिवासी भागातील शिक्षणाला दिशा देणारे पाऊल; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी फायदा

| नेरळ | प्रतिनिधी |

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजिपचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्तेवाड यांनी एक प्लॅन तयार केला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजिपच्या झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅब मंजूर करण्यात आली होती. त्या अंतर्गत या शाळेला पाच संगणक संच देण्यात आला असून, त्या संगणकात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचा निश्चितच फायदा इंग्रजी विषयाची भीती दूर करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी होणार आहे.

भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी लॅब सुरू करण्यात आली. आदीवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचे प्रभावी शिक्षण मिळावे, तसेच त्यांच्यामध्ये इंग्रजी संभाषण कौशल्य आणि संगणकीय ज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने ही इंग्लिश लॅब उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीच्या सदस्या कविता शिंगवे आणि केंद्रीय प्रमुख अमोल चोळके यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी सरपंच बेबी पादीर, मुख्याध्यापक रवी काजळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत पारधी, पोलीस पाटील जनार्धन पारधी, नारायण शिंगवा, सुनील सावळा, राजश्री पाटील, जनार्धन निरगुडा, लक्ष्मण पादीर, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल चोळके यांनी, “या इंग्रजी लॅबमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पहिलीपासून संगणक हाताळायला मिळत आहे. त्यामुळे त्याचा वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे”, असा मोलाचा संदेश दिला.

आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी झुगरे वाडी शाळेत राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून, इंग्रजी ची भीती असणाऱ्या विद्यार्थ्यांना या लॅब चा भविष्यात खूप फायदा होईल व त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागेल.

कविता शिंगवा,
सदस्य, पंचायत समिती

रायगड जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा झुगरे वाडीत या लॅबचे उद्घाटन होत आहे, ही निश्चित आमच्या नांदगाव केंद्रासाठी भूषणावह बाब असून, विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही.

अमोल चोळके,
केंद्रीय प्रमुख, नांदगाव
Exit mobile version