| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे नुकतेच ऑईल मिलचे उद्घाटन मुरुड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. सदरची ऑईल मिल ही नांदगाव विभागात सुरु करण्यात आली असून सर्व प्रकारच्या तेल बिया तसेच शेंगदाणे, सुके खोबरे आदी प्रकारचे तेल काढता येणार आहे.
याप्रसंगी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्रीधर जंजीरकर, संचालक मधुकर कोळी, दिलीप विरकुड, अनिल नाक्ती, रचना कवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी ऋतुजा चौलकर, चिराग दावरे, प्रभाकर गाणार, सरिता कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी उत्पादक संघाचे 360 सभासद असून सर्व सभासदांना एक किलो साठी 40 रुपये आकारण्यात येणार आहे, तर बिगर सभासदांना 60 रुपये लागणार आहेत. मुरुड तालुक्यात नारळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुके नारळ काही वेळा न वापरता तसेच पडून राहतात. अशा वेळी या नारळाचे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो, परंतु आता ऑईल मिल उपलब्ध झाल्याने सुक्या नारळापासून तेल काढता येणार आहे. हे शुद्ध खोबरेल तेल शेतकरी कंपनीला विकू शकतात. त्यामधून त्याना आर्थिक फायदा मिळणार आहे. यासाठी या ऑईल मिलचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांंनी घ्यावा, असे आवाहन श्रीधर जंजीरकर यांनी केले आहे.