शेकापच्या इंजिनमुळे राष्ट्रवादीचा डब्बा दिल्लीला; माजी आ. पंडीत पाटील यांची टिका

म्हसळ्यात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
। म्हसळा । प्रतिनिधी ।
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या इंजिनमुळेच राष्ट्रवादीचा डब्बा दिल्लीला पोहचला असल्याची टिका माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे. बुधवारी (दि.13) ओक्टोंबर रोजी म्हसळा तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

म्हसळा तालुक्यातील एकही असा गाव नाही जिथे शेतकरी कामगार पक्षा तर्फे विकास काम झाले नाही. शेकाप नेते दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दि.बा.पाटील व रघुनाथ म्हात्रे यांनी 1984 साली खर्‍या अर्थाने जिल्ह्यातील विकासकामांची सुरवात केली. म्हसळा शहरासहित तालुक्यातील सर्व गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना शेकापने मंजूर केली आहे. म्हसळा तालुक्यात एक दिवसात 27 योजना मंजूर करण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने करून दाखवले आहे.

म्हसळा तालुक्यातील आंबेतच्या नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रभाकर पाटिल यांनी लावला आहे. मात्र आम्ही केलेल्या कामांची मार्केटिग केली नाही, म्हणून दुसर्‍यांनी जनतेची दिशाभूल करून या कामाचे खोटे श्रेय घेतले आहे. जिल्ह्याच्या विकासाठी शेकाप नेहमी कटिबद्द असून आम्ही शाळा बांधल्या तर इतर नेत्यांनी फार्महाऊस बांधून स्वतःचा विकास केला असे वक्तव्य पंडित पाटील यांनी समारंभाप्रसंगी केले. म्हसळा तालुक्यात शेकाप भक्कम करण्यासाठी प्रत्येक महिन्याला या कार्यालयाला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी माजी तालुका चिटणीस परशुराम मांदाडकर, माजी जि.प.सदस्य गौरी पयेर, तालुका चिटणीस संतोष पाटील, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक गिजे, सरपंच निलेश मांदाडकर, माजी सरपंच पांडुरंग मांदाडकर, आरडीसीसी बँकेचे संचालक तुकाराम महाडीक, चंद्रकांत कांबळे, सूर्यकांत तांबे, सिद्दिक खान पठाण, अब्दुल धनसे, रशीद घरटकर आदी शेकापचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version