शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षणाचे उद्घाटन

| पनवेल/उरण | प्रतिनिधी |

दिशा महिला मंच आयोजित वैदिक मार्शल आर्ट्स रणरागिणी युद्धकला प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने शिवकालीन शस्रकला प्रशिक्षणाचे उद्घाटन शनिवारी (दि. 3) कामोठे, सेक्टर 6 येथील मैदानावर झाले. यावेळी तहसीलदार व अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू ललिता बाबर, श्रीमंत सरदार कृष्णाजीराजे बांदल यांचे 13 वे वंशज हरिश्‍चंद्रजी बांदल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे स्मिता जाधव व लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रा. स्वप्नाली म्हात्रे व प्रधानाचार्य अशोक महाराज पवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंचे प्रतिमा पूजन व शस्रपूजन करून प्रशिक्षणास सुरुवात झाली.

या प्रशिक्षण शिबिरात उत्स्फूर्त अशा प्रतिसादात 300 मुली, मुले व महिलांनी सहभाग नोंदवला. पुढील तीन महिने दर शनिवार व रविवारी हे प्रशिक्षण शिबीर कामोठ्यात होईल, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी दिली. या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिरामध्ये युद्ध कौशल्य, मानसिक आत्मनिर्भरता, व्यायाम, लाठीकाठी, तलवारबाजी, भाला, दांडपट्टा, स्वयंसंरक्षणाचे धडे शिकवले जातील, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचे विचार आणि महिला व मुलींच्या स्वयंसंरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आपल्या शहरातील सर्वांपर्यंत पोहचविण्याकरिता आम्ही दिशा व्यासपीठ व कामोठेकरांसोबत आहोत, असे आश्‍वासन यावेळी वैदिक मार्शल आर्ट्स रणरागीनी युद्धकला प्रशिक्षण संस्था, पुणे प्रधानाचार्य अशोक महाराज पवार यांनी दिले.

उपस्थित मान्यवरांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनाच प्रोत्साहन देत अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबीर राबवून महिला स्वयं संरक्षित होतीलच त्याचबरोबर राष्ट्रभक्ती ही यातून होत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले व कार्यक्रमाचे कौतुक करत यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी खुशी सावर्डेकर, दीक्षा ढोणे, वंदना वाघमोडे, गीता कुडाळकर, स्मिता वाघ, नीरव नंदोला, रेश्मा घाडगे, दीपाली सुर्वे यांचे सहकार्य मिळाले. सर्वांचे आभार मानत महिलांसाठी नेहमीच असे उपक्रम कामोठ्यात राबवले जातील, असे संस्थापक नीलम आंधळे यांनी सांगितले.

Exit mobile version