आक्षी शिलालेखाच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेखाचे जतन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, आक्षी शिलालेखाचे सुयोग्य जागेत प्रस्थापित करणे व परिसर सुशोभिकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी (दि.31) करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य सरकारने प्रादेशिक पर्यटन विकास योजना तसेच जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला होता.

कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्‍वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इस 1116-17 च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्‍वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तमिळ आणि मराठी भाषा कोरली गेली. श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले अशी वाक्ये या शिलालेखावर आढळतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे याहूनही जुना एक शिलालेख आढळून आला आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या अनास्थेमुळे हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून होता. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. श.गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिलालेखाची निर्मिती शके 934 म्हणजे इ.स.1012 झाल्याचा स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे. यासह आणखी एक शिलालेख आक्षी येथे दुर्लक्षित पने रस्त्याच्या कडेला उभा होता.

आक्षी येथील दोन शिलालेख रस्त्याच्या कडेला दुर्लक्षित अवस्थेत असून, शिलालेखाचे जतन करण्याची मागणी आक्षी ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी तसेच नागरिकांमधून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिलालेखाची पाहणी करीत शिलालेख जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घेत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत शिलालेख जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आक्षी शिलालेखाचे सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत प्राप्त निधीतून आक्षी शिलालेखाचे येथील समुद्रकिनारी असलेल्या साई मंदिर परिसरात सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात येणार आहे.

Exit mobile version