पी.एन.पी. महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

| अलिबाग | प्रतिनिधी |

कवी कालिदास दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा विभागातर्फे बुधवारी (दि.15) मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. उत्तरा खाडिलकर, माजी इतिहास विभाग प्रमुख भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण, महाविद्यालयाचे प्रशासकीय सल्लागार गबाजी गीते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमकार पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाने करण्यात आली. यानंतर कला व मराठी विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये महाविद्यालयातील मराठी विभागाचा थोडक्यात आढावा घेऊन मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट अधोरेखित केले.

विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. उत्तरा खाडीलकर यांनी आपल्या वक्तव्यामध्ये महाकवी कालिदास यांचा जीवनपट उलगडत, कालिदासांच्या कलाकृतींवर भाष्य केले. तसेच मराठी विभागात होत असलेल्या कार्यक्रमाबद्दल कौतुक करीत इतर पर्याय देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी मराठी विभागातील विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक करीत मराठी विभाग नेहमीच दर्जेदार कार्यक्रम राबवीत असतो असा विश्वास व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रा. रूपाली पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सर्व नियोजन व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठी विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version