वरसोली-अलिबाग येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

28 पर्यटक मार्गदर्शक होणार तयार
। अलिबाग । वार्ताहर ।

पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्यावतीने दि.28 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 या 5 दिवसाच्या कालावधीत अलिबाग येथील मराठी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय वरसोली येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी रघुजीराजे आंग्रे म्हणाले की, पर्यटन म्हणजे फक्त समुद्र, मच्छी थाळी आणि घोडागाडी सफर नव्हे, तर त्या भागातील संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदा यांची ओळख असते. ईश्वराने आपल्या कोकणावर निसर्ग, प्राणी, पक्षी यांची विपुल प्रमाणात उधळण केली आहे. त्याचबरोबर अर्वाचीन आणि मध्ययुगीन इतिहासाशी संबंधित अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. आक्षी येथील आद्य मराठी शिलालेख हा आपल्या सांस्कृतिक वारसाचा एक अमूल्य ठेवा आहे. वसई येथील पोर्तुगीज राजसत्ता, धर्मसत्ता यांचे आक्रमण चिमाजी आप्पा यांनी उखडून काढले, त्या युद्धात या परिसरातील अनेक वीरांनी सरखेल मानाजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखालील आरमारात योगदान दिले होते. या आरमाराच्या योगदानाप्रती कृतज्ञता आणि पराक्रमाचे विजयी प्रतीक म्हणून वसईच्या चर्चवरील एक घंटा मराठा आरमाराला प्रदान करण्यात आली होती. सरखेल मानाजीराव आंग्रे यांनी ती घंटा येथील खंडोबा देवस्थानास अर्पण केली. अशी अनेक उदाहरणे आपल्या परिसरात उपलब्ध आहेत. या संधीचा सुयोग्य वापर करून प्रशिक्षणार्थ्यांनी तिचे सोने करावे, असे आवाहन करून त्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला भाटकर, पर्यटन संचालनालय कोकण विभाग उपसंचालक हनुमंत हेडे, आय.आय.टी.टी.एम ग्वाल्हेरचे डॉ.रमेश देव्रथ, दि स्काय हॉटेलचे संचालक अभिजीत कवळे आणि ग्रामपंचायत वरसोलीचे सर्व सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक युवकांना पर्यटक गाईड प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे गाईड हा पर्यटन स्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो. या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्रेही देण्यात येणार आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि आलेल्या संधीचा योग्य उपयोग करावा. – हनुमंत हेडे , पर्यटन कोकण विभाग उपसंचालक

Exit mobile version