अन्नत्याग आंदोलनाला समाजाचा पाठिंबा
| रायगड | प्रतिनिधी |
शासनाकडे अनेकदा मागण्या करूनही केवळ आश्वासनांची खैरात होऊन पदरी केवळ निराशा आलेल्या कोळी समाजाने संघर्षाचा नारा वरसोली येथील खंडोबा मंदिरातील बैठकीत दिला. रायगड जिल्ह्यातील सुमारे 55 गावांमधील कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कोळी समाजाच्या नेत्यांनी बैठकीला उपस्थिती लावून विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करून लढ्याची रणनीती आखली. या बैठकीत सर्व कोळी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा, असा ठराव घेण्यात आला. 23 जानेवारी रोजी संविधानिक अधिकारांसाठी आदिवासी कोळी समाज समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी अन्नत्याग आंदोलनाला रायगड जिल्हा कोळी समाज संघाने रविवारी संपन्न झालेल्या बैठकीत पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर बैठकीत कोळी बांधवांना ग्रासलेल्या समस्या निवारणासाठी सरकारबरोबर पत्रव्यवहार करून कोळीबांधवांना दिलासा देणारे ठराव पारित केले.
वरसोली येतील खंडोबा मंदिर सभागृहामध्ये आयोजित केलेल्या बैठकीसाठी रायगड जिल्हा कोळी समाज संघाचे अध्यक्ष धर्मा घारबट, रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, अष्टागर अध्यक्ष गोरक्षनाथ नवरीकर, तेरा गाव अध्यक्ष ज्ञानदेव तांडेल, प्रवीण तांडेल आदी कोळी समाजाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या जागा आणि घरांच्या जागा कोळी बांधवांच्या नावावर करण्यासाठीचा विषय बैठकीत आल्यावर त्या विषयासाठी सरकार दरबारी पत्रव्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. जिल्हा मुख्यालय अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील कोळी समाजाचे कोळी भवन बांधण्यात यावे. यासाठी संबंधित यंत्रणेकडून संपर्क साधण्याचे ठरले. उदरनिर्वाहासाठी कोळी बांधवांनी काढलेले कर्ज माफ करण्यात यावे त्याचबरोबर मत्स्यव्यवसाय कृषी क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठीची मागणी करणायचा ठराव घेण्यात आला. सर्व कोळी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना अनुसूचित जमातीची जातप्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे देण्यात यावे या बाबतचा ठराव घेण्यात आला.
सागरी किल्ला असणाऱ्या खांदेरी येथे उभारण्यात येणाऱ्या खांदेरी पर्यटन प्रकल्पामध्ये स्थानिक मच्छीमारांना रोजगार निर्मितीसाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे. त्याचबरोबर या किल्ल्यात असणाऱ्या वेताळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबत शासनाला पत्रव्यवहार करण्याचा ठराव पारित करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई पासून वंचित असणाऱ्या कोळी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे , औद्योगिक विकासामुळे कोळी समाजाच्या होणाऱ्या नुकसानीबाबत संबंधितांना संपर्क करून समाजाला न्याय मिळवून देण्याबाबतचा ठराव वरसोली येथील खंडोबा मंदिरात करण्यात आला.