। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 अंपायर्सचा सहभाग असेल. पहिल्या सामन्यात दोन आशियाई अंपायर्स मैदानात दिसणार आहेत. आयसीसीच्या उदयोन्मुख अंपायर पॅनलचे चार सदस्यही विश्वचषक स्पर्धेत काम करतील.
आयसीसीने एकदिवसीय विश्वचषक 2023च्या पहिल्या सामन्यासाठी अंपायर्सची नावे जाहीर केली आहेत. भारताचे नितीन मेनन आणि कुमार धर्मसेना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या विश्वचषकातील सलामीच्या सामन्याची ही जबाबदारी पार पाडतील, असे सांगण्यात आले आहे. माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ या सामन्यासाठी सामनाधिकारी असतील. अहमदाबाद येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पॉल विल्सन टीव्ही अंपायर तर सैकत हे चौथे अंपायर असतील. आयसीसीच्या एमिरेट्स एलिट पॅनेलमधील सर्व 12 अंपायर्स असतीलच त्याशिवाय, आयसीसीच्या उदयोन्मुख अंपायर्स पॅनेलचेदेखील चार सदस्य असणार आहेत. त्यामुळे एकूण 16 अंपायर्स विश्वचषक स्पर्धेत काम पाहतील. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेफ क्रो, अँडी पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि श्रीनाथ यांचा सामनाधिकारी (रेफरी) म्हणून समावेश करण्यात आला आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी अंपायर्सची यादी: ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, मरायस इरास्मस, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, अहसान रझा, पॉल रीफेल, शराफुद्दौला इब्न शैद, रॉड टकर, ॲलेक्स वॉर्फ जोएल विल्सन आणि पॉल विल्सन.