वाहतूक पोलिस असतात कुठे?
| सुधागड-पाली | वार्ताहर |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. भाविक व पर्यटकांची वाहने, तसेच इतर अवजड वाहने यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी जटिल होत आहे. भरदिवसा कोंडी होत असते. रुग्णवाहिका तसेच परिणामी पर्यटक, भाविक व नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. परिणामी कोंडीमुळे वाहनचालक, भाविक, रुग्णवाहिका,पादचारी व विदयार्थ्यांची येथून वाट काढतांना मोठी गैरसोय होते.
पाली शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत आहे. शहरात दररोज हट्टाळेश्वर चौकात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिस कुठे असतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसांत शहरातील काही महत्त्वाच्या चौकांची पाहणी केली असता, गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस नसल्याचे चित्र जवळपास सर्वत्र दिसून आले. पाली -खोपोली महामार्गवर पोलिस असले, तरी वाहतूक नियमानाऐवजी एका कोपऱ्यात थांबून दंडात्मक कारवाईवरच त्यांचा अधिक भर असल्याचे पाहायला मिळते.पाली शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या हट्टाळेश्वर चौकात दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ सुरू असते. कमीतकमी गर्दीच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हट्टाळेश्वर चौकात एक तरी वाहतूक पोलिस उपस्थित असायला पाहिजे; पण त्यांचे सर्व लक्ष वाहतूक नियमनाऐवजी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याकडेच असतो असे प्रहार तालुका अध्यक्ष अमित निंबाळकर पत्रकारांशी बोलताना सांगितले.या बाबत संबंधित विभागाने दखल घेऊन पालीकरांना वाहतूक कोंडी या समस्या मुक्त करावे अशी मागणी केली आहे