अपूर्ण महामार्गाचा कोकणातील उद्योगांना फटका

वाहनचालक, प्रवाशांना त्रास; जमीन मोबदला न मिळाल्याने काम थांबविले
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात सिंधुदुर्गातील काम पूर्ण झाले आहे; मात्र इंदापूर ते खारेपाटण या टप्प्यातील काम आठ वर्षांत अपूर्ण असून ही कामे पूर्ण होण्यास अजूनही दोन वर्षे लागणार आहेत. महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. चौपदरीकरण अपूर्ण असल्याने कोकणात येणारे उद्योगही रखडले आहेत. पर्यायाने कोकण विकासाची गतीही पुढे गेलेली नाही.

महामार्ग चौपदरीकरणातील पनवेल ते इंदापूर या टप्प्याचे काम दहा वर्षे केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम सध्यस्थितीत 88 टक्के पूर्ण झाले आहे. इंदापूर ते झाराप या दरम्यानच्या चौपदरीकरणाला 2014 मध्ये मंजुरी दिली होती. भूसंपादन प्रक्रिया होऊन महामार्गाची जागा ताब्यात घेण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी गेला. त्यामुळे इंदापूर ते झाराप या दरम्यानच्या ठेकेदारांना 2017 मध्ये चौपदरीकरण कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला.

चौपदरीकरणात सिंधुदुर्ग हद्दीतील कामात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजकीय हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्यामुळे अवघ्या तीन वर्षांत खारेपाटण ते झाराप या सिंधुदुर्ग हद्दीतील चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले. सध्या केवळ दीड किलोमीटरचे काम शिल्लक असून, जमीन मोबदला न मिळाल्याने हे काम स्थानिकांनी थांबविले आहे. सिंधुदुर्गबरोबरच रायगड जिल्ह्यातही चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला असून, सरासरी 60 टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाची संथगती सुरू आहे. रत्नागिरीतील आरवली ते कांटे या विभागात केवळ 9 टक्के काम झाले आहे. तर कांटे ते वाकेड या टप्प्यात 16 टक्के काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्यातील कामे नव्याने सुरू झाली असून, इंदापूर ते खारेपाटण हा टप्पा पूर्ण होण्यास अजून दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागणार असल्याची माहिती महामार्ग अधिकार्‍यांकडून मिळाली.

धोकादायक वळणे
चौपदरीकरणात धोकादायक वळणे हद्दपार होण्याची अपेक्षा होती; मात्र अनेक भागात धोकादायक वळणे तशीच ठेवण्यात आली आहेत. याखेरीज अनधिकृत मिडलकट बंद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महामार्गावर अपघातांची मालिका कायम राहिली आहे.

Exit mobile version