उरण मार्गावरील स्थानकांत गैरसोयी

। उरण । वार्ताहर ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चार महिने उलटल्यानंतर अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेली नाही. यामुळे ऐन उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या हजारो प्रवाशांवर पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

जानेवारी 2024 पासून उरण-नेरुळ मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मागील चार महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत चालली आहे. उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या, मोठमोठे कूलर, नळ जोडण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अद्यापही चारही स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रवाशांची पाणी आणि शौचालयाच्या अभावामुळे मोठी गैरसोय होऊ लागली आहे.

Exit mobile version