कामोठे टपाल कार्यालयात नागरिकांची गैरसोय

प्राथमिक सुविधांचा वानवा; रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहण्याची वेळ

| पनवेल | वार्ताहर |

मूलभूत व प्राथमिक सुविधांचा अभाव असलेल्या कामोठे टपाल कार्यालयात नागरिकांची गैरसोय होत असून, ज्येष्ठ नागरिक व पेन्शनर नागरिकांसाठी येथे कोणतीही सुविधा नाही. नागरिकांना रखरखत्या उन्हात तासन्तास उभे राहावे लागत असल्याने उष्माघाताने बळी जाण्याची भीती नागरिकांना लागली असून, नागरिक सकाळी काम होण्यासाठी रांगा लावत आहेत. या टपाल कार्यालयात सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

गुंतवणुकीसाठी खात्रीची बँक म्हणून जास्तीत जास्त नागरिक पोस्टाला प्राधान्य देताना दिसून येतात. मात्र, पोस्ट ऑफिसांना समस्यांनी ग्रासले आहे, पण मनीऑर्डर, पार्सल, मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट, पासपोर्ट यापैकी एखाद्या कारणासाठी पोस्टाची पायरी चढावी लागते. कामोठे येथे 500 चौरस फुटांच्या टपाल कार्यालयातील वातावरणात पोस्टाचे कर्मचारी आणि ग्राहक वावरतात, हे धक्कादायक वास्तव आहे. पोस्ट खाते मात्र त्यांच्या खाकी नियमांना तिकिटाला लावलेल्या गोंदासारखे घट्ट चिकटून असल्याने ही स्थिती बदलण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. कामोठे शहराची लोकसंख्या तीन लाखांच्या वर असून, मूलभूत सुविधांसाठी येथील नागरिकांना अद्याप किती काळ वाट बघावी लागेल याचा नेम नाही. कर्मचार्‍यांना कोणतीही आरोग्याची व्यवस्था असून, येथे मूलभूत व प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, शौचालयाची सुविधा नसल्याने इमारतीच्या कॉमन शौचालयाचा आधार घ्यावा लागतो.

Exit mobile version