तळा पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची हेळसांड

अधिकार्‍यांकडून जेष्ठांना अरेरावी

| तळा | वार्ताहर |

पोस्ट ऑफिसमधील अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून नागरिकांना नेहमीच अरेरावी केली जात असून, मनमानी कारभारामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत. येथील असभ्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. येथील पोस्ट ऑफिसची कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते 5 अशी असतानाही दुपारी 2 वाजताच कार्यालय बंद होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. येथे तळा शहर आणि ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन असो अथवा लहान बालकांच्या योजना, दैनंदिन भरणा याच ठिकाणी केला जातो. यामुळे कार्यालयात नेहमीच गर्दी असते. परंतु, अधिकारी आणि कर्मचारी येणार्‍या अनेकांशी असभ्य वर्तन करतात. तर दोन नंतर येणार्‍या समस्त नागरिकांना थेट दुसर्‍या दिवशी येण्यास सांगितले जात आहे.

तळा पोस्ट ऑफिसमध्ये अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पंखे सुरू आहेत. परंतु नागरिकांसाठी उपलब्ध असलेला पंखा गेले पंधरा दिवस बंद आहे, बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर विजेची सोय उपलब्ध नसल्याने कामकाज पूर्ण ठप्प असते, पोस्टात काळोख असतो अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर नसतात, जनरेटर आहे परंतु ती सुरू करण्याची मानसिकता नाही याबाबतीत विचारणा केली असता मागणी केली आहे, अशी उत्तरे दिली जातात, मागणी करून महिना झाला तरी कुठलीच सेवा मिळत नसल्याने पुन्हा विचारणा केली असता आमची तक्रार करा, अशी अरेरावीची भाषा अधिकारी वर्गाकडून मिळत आहेत. अधिकारी वर्गाला नागरिकांशी काही देणे घेणे नाही अशी परिस्थिती असल्याने वरिष्ठांनी याची दखल घेऊन चांगल्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध कराव्यात व या कामचुकार अधिकारी वर्गावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version